
अंगणवाडी सेविकांना दर महिना 26 हजार व मदतनिसांना 20 हजार रुपये वेतन द्यावे, यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ संप, धरणे, मंत्र्यांना घेरावो अशी आंदोलने करूनही सरकार दखल घेत नसल्यामुळे आज अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हात महिलांनी तब्बल तासभर ठिय्या मारल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, शेकडो अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत वातावरण दणाणून सोडले.
गडहिंग्लज, दि. 23 (सा. वा.) – वेतनासह इतर मागण्यांसाठी सलग 30 दिवसांपासून आंदोलन करणाऱया अंगणवाडी कर्मचाऱयांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱयांनी आज गडहिंग्लज शहरातून ‘भीक मांगो आंदोलन’ करीत सरकारचा निषेध केला. ‘मानधन नको, वेतन हवे’ यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी 4 डिसेंबरपासून संपावर आहेत. गेले 50 दिवस झाले तरी शासनाकडून अद्याप तोडगा न निघाल्याने कर्मचाऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे. आज गडहिंग्लज शहरात विविध ठिकाणी तसेच बसस्थानकावर भीक मागत निषेध केला. अंगणवाडी कर्मचारी सभेचे सचिव बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.


























































