भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण – आनंद तेलतुंबडेकडून पत्राद्वारे आक्षेपार्ह मजकुराचे लेखन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले आनंद तेलतुंबडे हे त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून पत्र लिहितात. मात्र त्यांच्या पत्रात आक्षेपार्ह, निषिद्ध मजकूर आढळून आला असून हा मजकूर व त्यांची पत्रे ‘कारवान’ या मासिकात प्रसिद्ध केली जातात अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. तसेच आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी रमा तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावण्याची मागणी एनआयएने केली आहे.

आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी रमा तसेच अटक आरोपी वर्णन गोन्साल्विस यांच्या पत्नी सुझान यांनी तळोजा कारागृह प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कारागृह प्रशासन जाणूनबुजून पत्र लिहू देत नाहीत तसेच तेलतुंबडे यांनी लिहिलेली पत्र रोखली जातात हे निर्बंध कैद्यांच्या हक्कांच्या विरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. या याचिकेप्रकरणी एनआयएचे मुंबई शाखेचे अतिरिक्त  एसपी अनिल कुमार नायर यांच्याद्वारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, एखादा आरोपी आपल्या कुटुंबीयांशी तसेच वकिलांशी पत्राद्वारे संभाषण करू शकतो, पण त्या पत्रात आक्षेपार्ह असे काहीच असता कामा नये. आक्षेपार्ह मजकूर अथवा सामग्री तपासण्याचा अधिकार तुरुंग प्रशासनाला आहे. आरोपींपैकी एकाने ‘आर्थिक उद्दिष्टे घटनात्मक दृष्टिकोनाचा स्वीकार करू शकत नाही’ हा लेख लिहिला होता, अशा पत्रांची सामग्री नंतर ‘कारवान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मासिकाने प्रकाशित केली. तसेच याचिकाकर्त्यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही कैद्यांना पत्र लिहू दिली जातात, मात्र त्यात आक्षेपार्ह मजकूर असता कामा नये. आनंद तेलतुंबडे ‘मिस्टर रियाज’ नावाच्या ‘तिसऱ्या व्यक्ती’ ला पत्र लिहित होते आणि त्यात एल्गार परिषद प्रकरणामध्ये कट रचल्याबद्दल आरोप होता.  तपास यंत्रणेच्या मते, या पत्रांमुळे सहआरोपी रोना विल्सनच्या कॉम्प्युटरमध्ये पत्रे प्लांट करण्याबाबत एक लेख लिहिला गेला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी व याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावण्यात यावी.