
भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांची उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.
गौतम नवलखा यांनी पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शुक्रवारी यावर सुनावणी करत त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने त्याना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधीही दिला आहे. यादरम्यान त्यांना अटकेपासून दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून गौतम नवलखा यांच्यासह तेलगू लेखक वरवरा राव, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, वर्नोन गोन्सालविस आणि सुधा भारद्वाज, प्राचार्य आनंद तेलतुंबाडे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवलखा यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ऍड. युग चौधरी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

























































