
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात आज सकाळपासून 16 दरवाजातून 10 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दौंड येथून येणाऱ्या विसर्गात सतत घट किंवा वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बंडगार्डन येथील विसर्ग 20467 क्युसेक्सपर्यंत पोहोचला आहे. परिणामी नीरा-भिमा संगमापासून पुढे भीमा नदी प्रवाहामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्हा व उजनी धरण लाभक्षेत्रात सतत पाऊस झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या प्रमुख नद्यांना पूर येऊन उजनीच्या वरील 19 धरणांमध्ये 70ते 80टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दौंड येथील विसर्गात वाढ होऊन उजनी धरण 77 टक्केपर्यंत गेले होते. त्यामुळे उजनीतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, आषाढी यात्रेच्या कारणास्तव 4 जुलैपासून भीमा नदीतील विसर्ग बंद केला होता. मात्र, दौंड येथून विसर्ग चालू असल्यामुळे आज उजनी धरण 89 टक्के भरले असून 111 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आषाढी यात्रा संपताच आजपासून पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळपासून धरणाच्या 16 दरवाजातून 10 हजार क्युसेक्सने विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे. तसेच वीजनिर्मितीसह नदीपात्रात एकूण 11,600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.