भीमाशंकरचा रक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रावण महिना म्हणजे मांगल्याचे प्रतिक असलेला महिना. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे देवस्थान यापैकीच एक. भीमाशंकरच्या दाट जंगलात महादेव शतकानुशतके आहेत. भीमा नदीच्या काठावर एक शिवपूर्वकालीन किल्ला कित्येक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे. एकेकाळी भीमाशंकरसारख्या स्वयंभू स्थानाचे रक्षण करणारा हा गड म्हणजे किल्ले भोरगिरी होय.

किल्ले भोरगिरीस भेट देण्यासाठी आपणास पुणे – नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर गाव गाठावे लागते. राजगुरूनगर ते भोरगिरी अंतर साधारण 55 किलोमीटर आहे. राजगुरूनगर भीमाशंकर रस्त्याने आपल्याला राजगुरूनगर – चास – वाडा- डेहणे – शिरगाव ते गडपायथ्याचे भोरगिरी असा प्रवास करावा लागतो. भोरगिरीसारख्या छोटय़ा पण निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या सुंदर गावात भीमा नदीला येऊन मिळणाऱया ओढय़ाच्या काठावर किल्ले भोरगिरी उभा आहे. गावात प्रवेश करताच अंगाखांद्यावर असलेल्या गुहा समुहाने व त्या समोर फडकत असलेल्या भगव्या ध्वजामुळे भोरगिरी आपले लक्ष वेधून घेतो.

भोरगिरी हा एका छोटय़ा टेकडीवर असल्याने गावातून मळलेल्या पायवाटेने आपण पंधरा वीस मिनिटातच गडाच्या निम्म्या भागात असलेल्या गुहेपर्यंत पोहचतो. आधारासाठी चार खांब सोडून अतिशय प्रशस्तपणे खोदलेली ही गुहा दोन खणी असून, तिच्या आतील दालनात शिवलिंग आहे. या गुहेच्या आतील प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला शेंदूर फासलेले नागाचे शिल्प आहे. मुख्य गुहेच्या पलीकडे आणखी दोन गुहा असून त्याच्या आतील व पुढील भागात कातळकोरीव पाण्याची टाकी आहेत.

आपण गडाच्या निम्म्यावरील हा गुहा समूह पाहून परत माघारी फिरून गडमाथ्याकडे कूच करायचे. पुढे गडाचा कातळ डावीकडे ठेवत कातळात खोदलेल्या छोटय़ा पावटय़ांच्या वाटेने आपण गडमाथ्यावर दाखल होतो. येथे आपणास कातळ माथ्यावरील तटबंदीचे अवशेष दिसून येतात. गडप्रवेश करताच समोरच आपणास गडाच्या पोटातील कातळकोरीव धान्यकोठाराची वास्तू दिसून येते. धान्यकोठाराच्या दोन्ही बाजूंना पाण्याची खोदीव टाकी आहेत. धान्यकोठाराच्या आत एक शेंदूर फासलेली विरगळ आहे. धान्यकोठाराची प्रशस्त वास्तू पाहून पुढे गेल्यावर उघडय़ावरच गर्द झाडीत दोन सुंदर शिवलिंग व भैरवाची मूर्ती आपणास दिसून येते. या अवशेषाव्यतिरिक्त एक खांबटाके व एक खोदीव पण कोरडा पडलेला तलाव आपणास दिसतो. अशा रितीने भोरगिरी या छोटेखानी दुर्गाची आपली भटकंती पूर्ण होते.

आजमितीस भीमाशंकरसारखा इतका सुंदर शेजार लाभलेला असूनही हा किल्ला काहीसा उपेक्षितच आहे. खरतरं श्रावणात भोरगिरी परिसराचे निसर्गसौदर्यं अवर्णनीय असते. या महिन्यात चोहोबाजूंनी डोंगररांगावरून कोसळणारे असंख्य जलप्रपात, खळखळून वाहणारे ओढे नाले, रंगाची मुक्तपणे उधळण करणारी असंख्य रानफुले, हिरवीगार भातखेचरं या सर्व गोष्टींना एकप्रकारचा बहर आलेला असतो. तुम्हालाही जर ही सृष्टीची नवलाई अनुभवायची असेल तर श्रावणात भोरगिरी किल्ल्याला नक्की भेट द्या.

दुर्गप्रेमींनी आवर्जून पाहावे…
– भोरगिरीच्या भेटीत दुर्गप्रेमींनी आवर्जून पाहावे असे अजून एक ठिकाण म्हणजे भोरगिरी गावातील भीमा नदीच्या काठावर झंज राजाने बांधलेले प्राचीन शिवालय. कोटिश्वर महादेवाचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे पौराणिक मंदिर कित्येक शिल्पाकृतींनी सजलेले आहे. आदिवासी वेशभूषेतील गणेश शिल्प, नागशिल्प, कृष्णाचे शिल्प, शरभ शिल्प, नक्षीदार शिवलिंग व नंदी या सर्व अवशेषांनी हे मंदिर आजही देखणे आहे. भोरगिरीची वारी या पुरातन कोटिश्वर मंदिराशिवाय अपूर्ण आहे.

– भोरगिरी किल्ल्यावरील कातळकोरीव अवशेष पाहता हा निश्चितच शिवपूर्वकालीन किल्ला आहे. किल्ल्याचा छोटेखानी विस्तार पाहता त्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी व घाटातून होणाऱया व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यासाठीच होत असावा. शिवकाळात या गडाच्या जवळपास असलेल्या राजमाची, जीवधन व पदरगड या इतर किल्ल्यांप्रमाणे भोरगिरीसुद्धा महाराजांच्या ताब्यात नक्कीच असणार.

– डॉ. संग्राम इंदोरे,
दुर्ग अभ्यासक