
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशी माहिती दिली असून भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
नाशिक येथे सिंहस्थ कुभमेळा होणार आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरला येणारे भावीक लाखोंच्या संख्येने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामं पूर्ण करण्याचे प्रशासनाचे प्रमुख उद्दीष्ट आहे. मात्र, मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, या सर्व कामाला वेळ लागू शकतो. तसेच मंदिर परिसरात बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड आणि अन्य यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा ध्यानात घेत विकास कामांना गती देणं अत्यंत गरजेचं असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.























































