होऊ दे खर्च, हेलिकॉप्टर आहे घरचं! भिवंडीतील शेतकऱ्याने विकत घेतले 30 कोटींचे ‘बुंग’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिर्रर्रर्रर्र… भिर्रर्रर्रर्र… असा आवाज ऐकून भिवंडीच्या वडपे गावातील गावकरी घराबाहेर आले… अरे आलं रे आलं… ‘बुंग’ आलं असा गलका करत पोरंटोरंही धावत सुटली. अवघ्या पाच मिनिटांतच एका घरासमोर नव कोरं करकरीत हेलिकॉप्टर उतरलं… या हेलिकॉप्टरमधून ना कुणी मंत्री उतरले ना व्हिआयपी… त्यातून उतरलेल्या माणसांनी त्या घरमालकाला हेलिकॉप्टरचा ताबाच दिला… वाचून आश्चर्य वाटले ना… होय, पण हे सत्य आहे. भिवंडीच्या वडपे गावातील शेतकरी असलेल्या जनार्दन भोईर यांनी स्वतःसाठी चक्क 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत घेतलंय. एका शेतकऱयाने हेलिकॉप्टर विकत घेतल्याची ही पहिलीच घटना असून या बातमीने मराठी माणसाची मान नक्कीच अभिमानाने उंचावली आहे.

भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली. त्यामुळे मर्सिडीझ, फॉरच्यूनर, बीएमडब्ल्यू, रेंजरोव्हर, एमजी हेक्टर अशा गाडय़ा घेण्याची चढाओढच इथल्या गावकऱयांमध्ये सुरू आहे. अंजूर दिवे गावातील अरुण पाटील या उद्योजकाने चक्क अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात वापरली जाणारी पॅडिलॉक कार संपूर्ण देशात पहिल्यांदा खरेदी करण्याचा मान मिळवला. आता वडपे गावातील शेतकरी जनार्दन भोईर यांनी या सर्वांवर कडी करत चक्क मालकी हक्काचे हेलिकॉप्टर विकत घेतले आहे.

जनार्दन भोईर यांचे कुटुंब परंपरेने शेती करते. शेती करतानाच भोईर यांनी जोडधंद्याची कास धरली आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यांनी उभारलेला गोठा पंचकोशीत आदर्श ठरला आहे. दुग्धव्यवसायासोबत ते बांधकाम क्षेत्रात उतरले आणि त्यांच्या जमिनीत गोदामांचीही उभारणी केली. यातून भोईर यांच्या कुटुंबात आर्थिक सुबत्ता आली. दुग्ध व्यवसायानिमित्त त्यांना पंजाब, हरयाणा, गुजरात, राजस्थान या राज्यात नियमित ये-जा करावी लागते. तेथील व्यावसायिकही भोईर यांना भेटण्यासाठी येत असतात. त्यामुळे मग त्यांना चक्क 30 कोटींचे हेलिकॉप्टरच विकत घेतले.

विजयी उमेदवारांना हवाई सैर

भोईर नक्की हे हेलिकॉप्टर कुठे उभे करणार? त्याची व्यवस्था कशी करणार हे पाहण्यासाठी चिपसन कंपनीचे तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले. भोईर यांनी या हेलिकॉप्टरच्या पार्पिंगसाठी अडीच एकर जागा राखीव ठेवली असून त्याभोवती संरक्षक भिंत, हेलिपॅड, इंजिनीयर आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरचा ताबा 15 मार्चला मिळणार आहे. आज गावात उतरलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये भोईर एकटेच बसले नाहीत तर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना हवाई सैर घडवली.