जिगरबाज विद्यार्थिनीने अपहरणाचा डाव उधळला, भिवंडीतील रणरागिणीने स्वसंरक्षणासाठी प्राणपणाने केला मुकाबला; रिक्षाचालकासह दोघांवर करकटकने केला हल्ला

भिवंडीतील एका शाळकरी मुलीने स्वतःच्या अपहरणाचा डाव मोठय़ा हिमतीने उधळला. रिक्षाने शाळेत जात असताना या विद्यार्थिनीला तिच्या शाळेजवळ न थांबवता रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने पळवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच या बहाद्दर मुलीने प्रसंगावधान दाखवत दप्तरातील कंपास पेटीतून करकटक काढले आणि बाजूला बसलेल्या अपहरणकर्त्याला रिक्षातून ढकलून दिले. त्यानंतर रिक्षाचालकावर करकटकने हल्ला करत धावत्या रिक्षातून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. स्वसंरक्षणासाठी प्राणपणाने मुकाबला केलेल्या या विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नराधमांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

भिवंडी शहरातील फातिमानगर परिसरात राहणारी 16 वर्षीय शाळकरी मुलगी दुपारी 12 वाजता शाळेत जाण्यासाठी एका रिक्षात बसली. गाडीत तिच्या बाजूला आधीपासूनच एकजण बसलेला होता. ही रिक्षा रामनगर येथील शाळेजवळ येताच विद्यार्थिनीने ‘काका रिक्षा थांबवा, माझी शाळा आली’ असे सांगितले. मात्र त्यानंतर रिक्षाचालक व मागील सीटवर बसलेला त्याचा साथीदार एकमेकांकडे नजरानजर करत हसू लागले व रिक्षा जलदगतीने शहराच्या बाहेर जाणाऱया मुख्य रस्त्याच्या दिशेने पळवू लागले. पालकांनी तडक पोलीस ठाणे गाठले.

संकटाचा सामना करून शाळा गाठली

स्वसंरक्षणासाठी मुकाबला केलेली ही मुलगी न डगमगता शाळेत गेली. त्यानंतर सायंकाळी घरी गेल्यानंतर आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची तिने आईवडिलांना माहिती दिली. पालकांनी तत्काळ भिवंडी पोलीस ठाणे गाठत नराधमांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.