भिवंडीचा वऱ्हाळ तलाव मोकळा श्वास घेणार; कामतघर, फेणेगाव घाटातील गाळ काढण्याचे काम सुरू

भिवंडी शहरातील पुरातन वहऱ्हाळ तलाव गाळ आणि घाणीने भरला आहे. मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर आता प्रशासनाने वहाळ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात कामतघर, फेणेगाव, क्हाळदेवी घाटातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वहऱ्हाळ तलाव मोकळा श्वास घेणार आहे.

शहरातील पुरातन व धार्मिक भावना असणाऱ्या क्हाळ देवी मंदिराशेजारील तलावातून शहरात दररोज 5 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. 56 एकरांतील तलाव अतिक्रमणामुळे 52 एकरांचा झाला आहे. परंतु तीन विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन आणि निर्माल्य तसेच कचरा मोठ्या प्रमाणात जात असल्याने जलप्रदूषणात मोठी वाढ झाली. तलावातील पाण्यावर हिरवा तवंग व दुर्गंधी नित्याची बाब झाली होती. त्यातच कामतघर, ताडाळी, पद्मानगर, मानसरोवर या भागातील निर्माल्य थेट तलावात टाकले जाते. तर मानसरोवर फेणे पाडा येथील गटाराचे पाणी थेट तलावात सोडले जाते. कपडे धुणे, गाड्या धुण्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने कधीही गांभीर्य बाळगले नाही.

प्रशासनाला उशिरा जाग
तलाव परिसरात आजपर्यंत कधी सुरक्षारक्षक नेमण्यात आले नाहीत. तर तलाव परिसरात लावलेले सूचना फलक चोरी करण्यापर्यंत काहींची मजल गेली. मात्र उशिरा का असेना प्रशासनाला जाग आली असून पाणीपुरवठा विभागाने या घाटांवरील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे.