दरोडा घालण्यासाठी ती चौकडी चक्क बीएमडब्ल्यूमधून आली; भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

दरोडा घालण्यासाठी चक्क महागड्या बीएमडब्ल्यू कारमधून आलेल्या चौकडीवर भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी झडप घातली. त्यांच्याकडून चार बंदुका, लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड अशी जीवघेणी शस्त्रे आणि मिरची पूड व दोरखंड असे साहित्य हस्तगत केले. शोएब शेख (23), नौशाद खान (22), अफताब शेख (21), शहाबुद्दीन अन्सारी (20) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व दरोडेखोर बिहारमधील असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक मध्यरात्री गस्त घालत असताना वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथे एका कारमध्ये काही व्यक्ती बसल्याचे व त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची खबर पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, योगेश गायकर, पोलीस कर्मचारी रिझवान सय्यद, नीलेश महाले, लक्ष्मण सहारे, प्रशांत बर्वे, रोशन जाधव, दीपक सानप, भूषण पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.