आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी पुणे बनणार माहेरघर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhoi-foundation

विजय जोशी । नांदेड

भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. सासरवाशीण महिलांसाठी तर हा सण खासच. या दिवसांत माहेरहून आमंत्रण येतं. चार दिवस राहता येतं. अशी दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरच्यांनाही अनुभवता यावी म्हणून पुण्यातील भोई फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांसाठी आता पुणे हे माहेर झाले असून यंदाची दिवाळी पुण्यातील नामवंत कुटुंबीयांसोबत होणार आहे. या निमित्ताने अर्धापूर व पुण्याचे भावनिक नाते जुळणार आहे.

अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणासाठी पुण्यातील भोई फाऊंडेशने पुण्यजागर हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. यंदाची दिवाळी पुण्यातील नामवंत कुटुंबीयांच्या सानिध्यात साजरी करण्यात येणार आहे. आज हे सर्व कुटुंबीय पुण्याला रवाना झाले.

या सामाजिक दीपोत्सवाच्या तयारीसाठी अर्धापूर शहरातील पंडित लंगडे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत डॉक्टर मिलिंद भोई यांनी दिवाळीच्या सणानिमित्ताने पुण्याला येण्यासाठी निमंत्रण देऊन तयारी विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी राजाभाऊं कदम, डॉ. पुरंदरे, गुणवंत विरकर, मनोज देशमुख, लक्ष्मीकांत मुळे, नवनाथ ढगे आदी उपस्थित होते.