
सामना प्रतिनिधी। भोकरदन
पारध-धामणगाव रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांच्या घरी जाऊन काही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावास मारहाण केली. तसेच आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी पारध पोलीस ठाण्यात गेलेल्या नवनाथ दौड यांना देखील पारध पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर भाजपचे संतोष लोखंडे यांनी कार्यकर्त्यांना जमा करत धक्काबुक्की केली. पोलिसांनी मात्र संबंधितांवर काहीच कारवाई न करता उलट माफी मागून प्रकरण मिटवा, असा सल्ला दिला.
सोमवार, २८ जानेवारी रोजी राजू गायकवाड, शिवाजी गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, दामू गायकवाड यांच्यासह काही भाजप कार्यकर्त्यांनी पारध-धामणगाव रस्त्याबाबत सुरू असलेल्या वादाचा राग मनात धरून नवनाथ दौड यांच्या घरी गेले. तेथे त्यांचा भाऊ शिवसैनिक सुदाम दौड यास मारहाण करून त्यांच्याच घरात डांबले. त्यांच्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
पारध-धामणगाव रस्त्याचे संजय खोतकर यांच्या हस्ते भूमिपूजन केल्याचा राग मनात धरून भाजप कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी करत शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. याप्रकरणी दौड हे पारध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता शिवा लोखंडे, बाळू लोखंडे, अमोल देशमुख यांच्यासह काही कार्यकत्र्यांनी पोलीस ठाण्यात धक्काबुक्की केली.






























































