
सामना ऑनलाईन। भोपाळ
नदीजोड प्रकल्प योजनेच्या कामाचा शुभारंभ झाला असून, याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. त्रिवेणीजवळ सहा पाइपांमधून नर्मदा नदीचे पाणी शिप्रा नदीत सोडण्यात आले आहे. शनिवारपासून एनव्हीडीएच्या अंतिम चाचणीनंतर पाइपद्वारे एका मिनिटाला 1.20 लाख लिटर पाणी शिप्रा नदीत सोडण्यात येत आहे.
‘एनव्हीडीए’कडून उज्जैन येथे स्नानपर्वास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जून 2018 मध्ये 65 किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले होते. नर्मदा-शिप्रा लिंकद्वारे उज्जैनच्या त्रिवेणी संगमपर्यंत 1325 एमएम आकाराची ही पाइपलाइन उभारण्यात येत असून, त्यासाठी 138 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यानुसार, 15 जून रोजी संबंधित कंत्राटदार कंपनीकडून पाइपलाइनद्वारे त्रिवेणीमध्ये पाणी सोडण्यात आल्याचे शासनाच्या अधिकाऱयांनी सांगितले. या पाइपलाइनद्वारे एका नदीतून दुसऱया नदीत एका मिनिटाला 1.20 लाख लिटर पाणी सोडण्यात येत आहे. एनव्हीडीएच्या या प्रकल्पामुळे शहरात नर्मदा नदीचे पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याचे प्रकल्प अधिकारी धर्मेंद्र वर्मा यांनी सांगितले.
देशभरात अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी, सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी, पूर व दुष्काळ परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी तसेच पाण्याच्या उपलब्धतेमध्ये असलेला प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी राष्ट्रीय जलविकास संस्थेने (एनक्हीडीए) प्रभावी मार्ग शोधून काढला आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशातील ज्या नद्या समुद्राला मिळत नाहीत, अशा नद्यांचे पात्र नियोजित कालव्याद्वारे इतर नद्यांच्या पात्रांना जोडले जाणार आहे. त्यामुळे देशातील अधिकाधिक जमीन ओलिताखाली येईल.





























































