महामार्गावरील भोस्ते घाट पोखरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी I खेड

मुंबई गोवा महामार्गावरील अवघड भोस्ते घाट पोखरण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे . पावसाळा सुरू होण्याआधी घाटाचे काम तमाम करण्याचा ठेकेदार कंपनीचा प्रयत्न आहे . मात्र घाटातील काही भाग अदयाप कंपनीच्या ताब्यातच दिला गेला नसल्याने ठेकेदाराच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे कशेडी ते परशूराम घाट दरम्यानचे 44 किलोमीटरचे काम कल्याण टोलवेज ही कंपनी करत आहे . या दरम्यानअसलेल्या चार किलोमीटरच्या भोस्ते घाटाचे काम कंपनीसाठी आव्हानात्मक आहे . घाटातील अवघड वळणं काढण्याबरोबरच चढ देखील कमी करायचा असल्याने संपूर्ण घाट पोखरणे आवश्यक आहे .

घाटातील काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सुरुवातीपासूनच ठेकेदार कंपनीने भोस्ते घाटातील कामाला प्राधान्य दिले आहे. वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री वापरून कर्मचारी रात्रंदिवस घाट पोखरण्याचे काम करत आहेत . उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत केवळ ५०% घाट तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे .

पावसाळा सुरू झाला की घाटात काम करताना अनेक अडचणी येणार आहेत. दगड माती रस्त्यावर येऊन चिखल होण्याची शक्यता असते त्यामुळे ठेकेदाराला घाटाचे काम पाऊस सुरू होण्याआधी पूर्ण करायचे आहे मात्र घाटातील काही जमीन अद्याप ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात आली नसल्याने पावसाळ्यापूर्वी घाटाचे काम पूर्ण होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे .