बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीएचआर मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेमधील कोट्यवधींच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याला पकडण्यात पोलिसांना आज अखेर यश आले. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला नाशिकच्या पंचवटीतून ताब्यात घेतले आहे.

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल आहे. मुख्य संशयित असलेला सुनील देवकीनंदन झंवर हा गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. तो नाशिकला आल्याची माहिती कळताच पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक काल रात्रीच नाशिकला पोहोचले. त्यांनी सापळा रचून पंचवटीतून त्याला आज सकाळी अटक केली, याबाबतची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील सर्वच बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.