
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव बुधवारी (दि. 1) रात्री फुटला. तलाव फुटल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, दोन्ही बाजूची सर्व पिके वाहून गेली. मेघोली, नवले, सोनूर्ली ममदापूर, वेंगरूळ गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. या पाण्यामध्ये नवले गावातील एक महिला वाहून गेल्याची घटना घडली. घटनास्थळी तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकाऱयांनी भेट दिली.
लघुपाटबंधारेचा हा तलाव 22 जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. तलावात 98 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. गेल्या काही दिवसांपासून तलावाच्या गेटजवळून पाणीगळती सुरू होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने वाळूची पोती टाकली होती. याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली होती.
बुधवारी रात्री ओढय़ाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली होती. रात्री अकराच्या सुमारास तलाव फुटला. प्रचंड पाण्याच्या प्रवाहात मुळासकट झाडे उन्मळून पडली. विजेच्या खांबांसह उभी पिके भुईसपाट झाली.
महिला वाहून गेली
पाण्याच्या प्रवाहात नवले येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते (वय 55) या वाहून गेल्या. जिजाबाई त्यांचे पती, मुलगा, नातू गोठय़ातील जनावरांना सोडत होते. त्यांनी काही जनावरे सोडली. पाणी अचानक वाढल्याने अंधारात पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले. पती, मुलगा आणि नातू झाडाला धरून बाहेर पडले. मात्र, जिजाबाई या पाण्यात वाहून गेल्या. आज त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच निवृत्ती मोहिते यांची चार जनावरे गोठय़ातच मृत्युमुखी पडली.
गारगोटी येथे अलर्ट
गारगोटी येथे वेदगंगा नदीचे पात्र असल्याने रात्री धरण फुटल्याचे समजताच प्रशासनाने गारगोटी येथेही अलर्ट दिला. नदीकाठावरील लोकांना जागे करून दक्षतेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नदीकाठावरील लोकांनी रात्र जागून काढली.




























































