Swati Maliwal assault case : केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांना अटक

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीएस बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री निवासस्थानावर ही अटकेची कारवाई करण्यात आली असून बिभव कुमार यांना सिव्हील लाईन पोलीस स्थानकात नेले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांनी आपल्याला लाथा मारल्या आणि सात-आठ वेळा थपडाही लगावल्या, असा आरोप आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात केला होता. मालिवाल यांच्या जबाबानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून त्यात आरोपी म्हणून बिभव कुमार यांचे नाव देण्यात आले. या तक्रारीनंतर आज बिभव कुमार यांना अटक करण्यात आली.

मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणप्रकरणी दाखल झालेल्या या एफआयआरमध्ये, बिभव कुमार त्यांना पूर्ण ताकदीने वारंवार मारत असताना त्या मदतीसाठी ओरडत होत्या पण, कुणीही त्यांच्या बचावासाठी आले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तीस हजारी कोर्टात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मालिवाल यांनी याच प्रकरणी आपले निवेदनही नोंदवले.