
महापालिकेच्या अधिकाऱयाला केलेल्या कथित मारहाण प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांच्यासह इतर पाच शिवसैनिकांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. राजकीय वैमनस्यातून विरोधकांना टार्गेट केले जात आहे. कथित मारहाणीबद्दल दाखल केलेला गुन्हा त्याचाच एक भाग आहे, असा जोरदार युक्तिवाद ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत सत्र न्यायालयाने अनिल परब यांच्यासह इतर पाच शिवसैनिकांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर 4 जुलैला सुनावणी निश्चित केली. तोपर्यंत अर्जदारांवर कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
वांद्रे पूर्वेकडील शिवसेनेच्या शाखेवर पालिकेने पोलीस बळाचा वापर करून भ्याडपणे तोडक कारवाई केली. त्या कारवाईच्या निषेधार्थ पालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शाखेवरील कारवाईदरम्यान हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावर हातोडा चालविण्यात आला होता. त्या मुद्दय़ावरून शिवसैनिकांनी पालिका अधिकाऱयाला चोप दिला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी चार शिवसैनिकांना अटक केली. तसेच अनिल परब यांच्यासह इतर शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने अनिल परब यांच्यासह स्नेहा साटम, दीपक भुतकर, दिनेश कुबल, संदीप शिवलकर, चंद्रशेखर वायंगणकर यांनी अॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली. या वेळी ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी पोलिसांकडून करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा केला. अनिल परब हे केवळ त्या ठिकाणी हजर होते. तेथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. मात्र राजकीय वैमनस्यातून गुन्हा दाखल केला गेला आहे. विरोधक असल्यामुळे अशा प्रकारे टार्गेट केले जात असून अटकपूर्व जामीन अर्जांवर तातडीने सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद अॅड. पासबोला यांनी केला. दरम्यान, न्यायालयीन कोठडीतील सदानंद परब, संतोष कदम, उदय दळवी, हाजी हलीम खान यांच्या जामीन अर्जांवरही न्यायालय 4 जुलैला सुनावणी करणार आहे.


























































