
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना आज सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला. अस्थाना यांच्या अटकेला न्यायालयाने 1 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली. त्याचबरोबर या प्रकरणात सीबीआयला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने मुदत वाढवून दिली आहे.
लाचखोरीच्या आरोपावरून उच्चपदस्थ अधिकाऱयांनी एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीमुळे सीबीआयच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. या प्रकरणात एका अधिकाऱयाला अटक करण्यात आली असून संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. नागेश्वर राव यांच्याकडे संचालक पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सीबीआयला आपल्याच मुख्यालयावर छापेमारी करण्याची नामुष्की ओढवली. मुख्यालयातील दोन मजल्यांवरील कागदपत्रे जप्त करून ती सील करण्यात आली. विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या अटकेच्या हालचाली सुरू असतानाच आज सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.

























































