
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ज्या व्यापाऱयाची वार्षिक उलाढाल 40 लाखांपर्यंत असेल त्यांना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 20 लाख रुपयांची उलाढाल करणाऱया व्यवसायांपर्यंत होती. गेल्या महिन्यात काही वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आल्यानंतर छोटय़ा व्यापाऱयांना दिलासा देण्याचा प्रयत्न आज करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे निर्णय घेतले जात आहेत.
जीएसटी परिषदेतील निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली. 40 लाखांपर्यंत वार्षिक उलाढालीवर जीएसटी आकारला जाणार नाही. उत्तरपूर्व राज्ये आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये ही मर्यादा मात्र 10 लाख रुपये असेल. सर्व राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास वार्षिक महसुलात 5200 कोटी रुपयांची घट होणार आहे. तसेच कम्पोझिशन स्कीमअंतर्गत येणाऱया कंपन्यांसाठी मर्यादाही 1.5 कोटी रुपयांपर्यंत शिथिल करण्यात आली. या स्कीममध्ये येणाऱया कंपन्यांना 1 टक्के कर भरावा लागेल. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल. याचबरोबर सेवा पुरवठादार कंपन्यांनाही कम्पोझिशन स्कीममध्ये घेण्यात येणार आहे.
रिअल इस्टेटसाठी मंत्रीगट स्थापणार
बांधकाम क्षेत्रासाठी जीएसटी दर निश्चित करण्यासाठी सात सदस्यांच्या मंत्रीगटाची स्थापना करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.




























































