
सामना ऑनलाईन । मुंबई
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आतापर्यंत गहाळ असलेली सुसाईड नोट न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेला सापडल्याने, या प्रकरणाला आता एक नवे वळण आले आहे.
डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी हेमा आहुजा, भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टर तुरुंगात आहेत. जातीवाचक शिवीगाळाला आणि छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हीने आत्महत्या केल्याचा तर्क पोलिसांनी न्यायालयात मांडला होता. परंतु या प्रकरणात सुसाईड नोट गहाळ असल्याने पोलिसांना मोठा अडथळा निर्माण होत होता. मुंबई मिररच्या वृत्तात म्हटल्यानुसार न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेला तपासादरम्यान डॉ. पायलच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या नावासोबतच त्यांच्याकडून होणाऱ्या जातीवाचक शिवीगाळाचा आणि धमक्यांचाही उल्लेख पीडित डॉक्टरने केला होता. पायलच्या मोबाईलमध्ये ही सुसाईड नोट सापडल्याने आता या प्रकरणात मुख्य सुसाईड नोट कोणी गहाळ केली, असा नवीन प्रश्न पोलिसांसमोर उद्भवला आहे. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेतील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, ‘आत्महत्या करण्याच्या काही वेळेआधीच पायलने सुसाईड नोट लिहून त्याचा फोटो स्वतःच्या मोबाईल फोनमध्ये काढला होता.’ कलिना न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेने सोमवारी क्राईम ब्रँचला सुसाईड नोट मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती व सुसाईड नोट गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडे सोपवली व न्यायालयाने या सुसाईड नोटचे हस्ताक्षर परिक्षण करण्याचा आदेश क्राईम ब्रँचला दिला आहे.
जून महिन्यात तिन्ही आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. त्यातच आता डॉ. पायल तडवीच्या फोनमध्ये गहाळ सुसाईड नोटचा फोटो मिळाल्याने प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे. पायलने तिच्या आईला सुसाईड नोट पाठवण्यासाठी फोटो काढला असवा मात्र काही कारणाने तिने तो पाठवलाच नाही, असे एक न्यायवैद्यकीय तज्ज्ञाने सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायलने आत्महत्या केल्यानंतर तिघी आरोपींपैकी दोघी तीन मिनिटे तिच्या खोलीत होत्या. याच दरम्यान त्यांनी सुसाईड नोट आणि अन्य पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता पोलिसांना वाटते आहे.






























































