
जदयुचे नेते नितीशकुमार हे सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार आहेत. एनडीएच्या रविवारी झालेल्या बैठकीत त्यांची विधिमंडळ नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार बनवण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
रविवारी नितीशकुमार यांच्या निवासस्थानी राज्यातील भाजप आणि जदयुच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मित्रपक्षांचे आमदारही बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी नितीशकुमार यांची एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर एनडीएचे नेते राजभवनात गेले. तेथे त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन एनडीएच्या सत्तास्थापनेसाठी दावा केला. त्यावर राज्यपालांनी नितीशकुमार यांना नवीन सरकार बनवण्यासाठी निमंत्रण दिले. त्यानुसार नितीशकुमार हे सोमवारी सायंकाळी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथग्रहण करणार आहेत. एनडीएने निवडणुकीआधीच नितीशकुमार हेच आपले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहतील, अशी घोषणा केली होती.
मंत्रिमंडळाबाबत अजूनही स्पष्टता नाही
एनडीएमध्ये भाजपचे सर्वाधिक 74 आमदार आहेत, तर जदयुचे 43 आणि हम व व्हीआयपीचे प्रत्येकी चार आमदार आहेत. मंत्रिमंडळात जास्त मंत्रीपदे भाजपकडे की जदयुकडे असतील, याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाही. उपमुख्यमंत्री पद भाजपच्या सुशीलकुमार मोदी यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. मात्र या पदावर भाजपचे दुसरे नेते प्रेमकुमार यांनीसुद्धा दावा केला आहे, तर दलित नेते कामेश्वर चौपाल यांचेही नाव चर्चेत आहे. दरम्यान, राजदनेते मनोजकुमार झा यांनी, अवघ्या 40 जागा मिळालेल्या असताना नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, बिहारची जनता लवकरच दुसरा पर्याय शोधू शकते.
नितीशकुमार यांची दोस्ती महागात पडली
सुशील मोदी यांना नितीशकुमार यांच्याशी असलेली दोस्तीच महागात पडली असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मोदी यांनी नितीश यांना ‘पीएम मटेरियल’ संबोधून जणू नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले होते. एवढेच नव्हे तर सुशील मोदी यांनी नितीशकुमार यांची पाठराखण करताना अनेकदा बिहारमधील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांशीही पंगा घेतला होता. त्यामुळेच त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
माझी इच्छा नव्हती…
राज्यपाल भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले, माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजपामधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे असे सांगून नितीशकुमार म्हणाले, राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल.
दोन उपमुख्यमंत्री; सुशील मोदींना हटवले
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री नसतील. मोदी यांनी ट्विटरवरून आपला उपमुख्यमंत्रीपदाचा परिचयही हटवला आहे. त्यांना भाजप दिल्लीत बोलावून घेईल आणि केंद्रीय मंत्रीपद दिले जाईल असे सांगण्यात आले. तर बिहारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील आणि त्यासाठी तारकिशोर प्रसाद व रेणु देवी यांची नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.



























































