अरेच्चा, आकाशातून चक्क माशांचा पाऊस पडला

बिहारमधील लखीसराय भागात शुक्रवारी आकाशातून माशांचा पाऊस पडला. आकाशातून पडलेले हे मासे गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचेही समोर आले आहे.  गावकऱ्यांना सुरुवातीला वाटले की, पावसासोबत काही किडे पडत आहेत, मात्र लोकांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना पावसासोबत जिवंत मासे पडत असल्याचे दिसले. यानंतर गावकऱ्यांनी हे मासे गोळा करण्यासाठा गर्दी केली. काही लोकांनी एक किलोपेक्षा जास्त मासे गोळा केल्याचे समोर आले आहे. गावातील बरेच लोक याला चमत्कार मानत आहेत. मात्र हा चमत्कार नाही, तर एक नैसर्गिक घटना आहे. अनेकदा लहान चक्रीवादळ समुद्र, नदी किंवा तलावाच्या पृष्ठभागावर तयार होते. पाणी गोल गोल फिरून आकाशात जाते त्याबरोबर मासेही आकाशात खेचले जातात.