बिहारमध्ये गँगरेप! पिडीतेने फाशी घेवून केलीआत्महत्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

उत्तरप्रदेशातील हाथरसमधील सामुहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश संतप्त असतानाच बिहारमध्ये एका दलित अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी गँगरेप केला. या भयंकर घटनेनंतर पिडीत मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. पाच दिवस झाले तरी नराधम आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

गया जिल्हय़ातील कोंची गावात 29 सप्टेंबरला ही भयंकर घटना घडली. 14 वर्षांची दलित अल्पवयीन मुलगी गावात मैत्रीणीच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी गेली होती. वाढदिवस साजरा झाल्यानंतर तीन मैत्रीणींबरोबर घरी परत येत असताना चारजणांनी आडवले. तिघी मैत्रीणी कशाबशा सुटका करून घरी पळाल्या. त्या 14 वर्षाच्या मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला. बेशुद्ध अवस्थेत पिडीत मुलगी शेतात पडून होती. तिच्या अंगावर जखमा होत्या. कुटुंबातील लोकांनी रात्रभर शोध घेतला पण मुलगी मिळाली नाही. सकाळी शेतात आढळली. तिने घरी आल्यानंतर कुटुंबियांना बलात्कार झाल्याचे सांगितले. या धक्क्यातच तीने खोलीत बंद करून घेतले आणि गळफास लावला. दरवाजा तोडून आई-वडिलांनी मुलीला पाटणा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पिडीतेचा 30 सप्टेंबरला मृत्यू झाला.

पोलीस म्हणाले, तपास सुरू आहे
मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर कुटुंबाने गावातील चार जणांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही. जिल्हा पोलीस प्रमुख राजीव मिश्रा यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेवून आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

48 तासांत बलात्काराच्या तीन घटना
– बिहारमध्ये 48 तासांत बलात्काराच्या तीन घटना घडल्या आहेत. शुक्रवारी गया जिल्हय़ातच 12 वर्षीय दिव्यांग मुलीवर बलात्कार झाला. यात आरोपीला गावकऱयांनी पकडले आणि बेदम मारहाण करून पोलिसांच्या हवाली केले.

– कैमुर जिल्हय़ात गुरूवारी एका अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी गँगरेप केला. त्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघा नराधमांना अटक केली आहे.