सडेतील महिला सरपंचाने राबविला ‘बिहार पॅटर्न’

>> राजेंद्र वाडेकर, राहुरी

राहुरी ग्रामपंचायतीच्या तीन किलोमीटर हद्दीत नारळाची झाडे लावून गाव सुशोभीकरण, ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्रोत, तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम सडे येथील महिला सरपंच सविता सर्जेराव पानसंबळ यांनी राबवून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ‘बिहार पॅटर्न’ म्हणून ओळख असलेल्या नारळाच्या झाडाची लागवड नगर जिह्यात प्रथमच सडे येथे अमलात आणली आहे.

चार हजार लोकसंख्या असलेल्या सडे गावाची 100 टक्के बागायत भाग म्हणून राहुरी तालुक्यात ओळख आहे. सरपंचपदाला साजेसे काम उभे राहण्याचा संकल्प करून सडे गावच्या सरपंच सविता पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली गावात विकासकामांबरोबरच एक आगळावेगळा उपक्रम म्हणून ‘बिहार पॅटर्न’च्या धर्तीवर गावात आज नारळाच्या एक हजार झाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमासाठी प्रतिझाड 150 रुपये याप्रमाणे शासनमान्य नर्सरीतून नारळाची रोपे खरेदी करण्यात आली. नारळाच्या एका झाडासाठी राहुरी पंचायत समितीकडून 50 रुपयांचे अनुदान सडे ग्रामपंचायतीला मिळणार आहे. सडे गावाच्या तीन किलोमीटर हद्दीत लावण्यात आलेल्या नारळाच्या झाडांमुळे गावाच्या सुशोभीकरणास मदत होणार आहे.

गावाच्या विकासात ग्रामपंचायतीचे मोठे योगदान समजले जाते. मात्र, समाजकारण बाजूला ठेवून राजकारणाला महत्त्व देणाऱया गावपुढाऱयांची संख्या तालुक्यात उदंड झाल्याने गावाचा विकास थंडावला आहे.

– धीरज पानसंबळ, युवा कार्यकर्ते, सडे

झाडांच्या संगोपनासाठी तरुणांची नियुक्ती

लागवड केलेल्या एक हजार नारळाच्या झाडांच्या संगोपनासाठी गावातील पाच बेरोजगार तरुणांची ग्रामपंचायतीमार्फत तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला 200 नारळाच्या झाडांची देखभाल सोपविण्यात आली आहे. याबदल्यात एका व्यक्तीस 300 रुपये रोजंदारी रोजगार हमी योजनेतून मिळणार आहे. प्रत्येक झाडांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीमार्फत लोखंडी गार्ड बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपसरपंच प्रकाश धोंडे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिली.

वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने भविष्यात पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करण्याची वेळ येणार आहे. हा अनर्थ टाळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘झाडे लावा, निसर्ग वाचवा’ हा उपक्रम राबविणे गरजेचे बनले आहे.

– सविता पानसंबळ, सरपंच, सडे ग्रामपंचायत