श्राद्धविधी सुरू असताना दारात अवतरली मृत व्यक्ती

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे ज्या व्यक्तीचे श्राद्ध सुरू होते तीच व्यक्ती दारात अवतरल्याची अविश्वसनिय घटना घडली आहे. संजू ठाकूर (35) असे या व्यक्तीचे नाव आहे.

बुधनगरा गावात राहणारे माजी सैनिक रामसेवक ठाकुर यांचा संजू मुलगा असून तो गतीमंद आहे. तो ऑगस्ट महिन्यात घरातून अचानक बेपत्ता झाला होता. त्यामुळे रामसेवक यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती. पोलिसही त्याचा शोध घेत होते. पण संजूचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. पण दोन दिवसांपूर्वी रामसेवक यांना पोलिसांचा फोन आला. गावाजवळील एका नाल्याशेजारी संजूच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या व्यक्तीचा सडलेला मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रामसेवक यांनी तो संजूच असल्याचे सांगत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर रामसेवक यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी श्राद्धविधी सुरू असताना अचानक दरवाजात संजूला बघून सगळे हादरले. मृत संजू जिवंत कसा झाला याचीच चर्चा सुरू झाली. पण तोच खरा संजू असल्याची खात्री पटल्यानंतर रामसेवक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

संजूला त्याच्या बेपत्ता होण्याबद्दल विचारे असता त्याने तो एका श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात गेला होता असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या