पतंगाचा मांजा चुकविण्याच्या नादात दुचाकी पुलावरून 70 फूट खाली कोसळली, पती-पत्नीसह 10 वर्षाच्या मुलीचा करूण अंत

मकरसंक्रांतीला देशभरामध्ये पतंग उडविले जातात. मात्र पतंग उडविताना अनेकदा अपघातही होतात. पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांजामुळे अनेकांचा जीव गेल्याचेही समोर आले आहे. अशातच गुजरातमधील सूरत येथेही मकरसंक्रांतीच्या दिवशी एक दुर्देवी घटना घडली आहे. पतंगांचा मांजा चुकविण्याच्या नादात दुचाकी पुलावरून 70 फूट खाली कोसळली. या अपघातामध्ये दुचाकीवरील पती-पत्नीसह 10 वर्षांच्या मुलीचा करूण अंत झाला. या अपघाताचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला रेहान रहीम शेख (वय – 35) हा पती रेहाना (वय – 33) आणि मुलगी अलिशा (वय – 10) यांना घेऊन दुचाकीवरून जात होता. पुलावरून जात असताना दुचाकीसमोर अचानक एका पतंगाचा मांजा आला. पतंगाचा मांजा चुकविण्याच्या नादात रेहान यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. अनियंत्रित दुचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर 70 फूट खोल खाली कोसळली. या भीषण अपघातामध्ये रेहान आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर, त्यांची पत्नी रेहाना गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं?

14 जानेवारीला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका पतंगाचा मांजा अचानक दुचाकीसमोर येतो. दुचाकीवरून रेहान हाताने हा मांजा काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटते. त्यानंतर दुचाकी दुभाजकाला धडकून थेट पुलावरून खाली कोसळते आणि खाली उभ्या ऑटो रिक्षावर पडते. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ऑटो चालक आणि प्रत्यक्षदर्शी इक्बालने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी सायंकाळी सव्वा पाच वाजता चहा पिण्यासाठी येथे आलो होतो. चहा प्यायल्यानंतर मी रिक्षात बसताच पुलावरून तीन लोक खाली पडले. यात एक महिला, एक लहान मुलगी आणि एक पुरुष होता. ते सर्व माझ्यासमोर पडले आणि दुचाकी रिक्षावर पडली. यात दुचाकीचा चक्काचूर झाला असून मलाही किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. पोलीस तपासात रेहान हा दागिने बनविणारा कारागीर होता आणि तो कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ‘इंडिया टू़डे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.