छत्तीसगडमध्ये भीषण रेल्वे अपघात; 8 जण ठार, 14 गंभीर जखमी

छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मंगळवारी मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले, तर 14 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जयराम नगर स्टेशनजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर या मार्गावरील गाडय़ा इतरत्र वळवण्यात आल्या आहेत, तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. ही धडक इतकी भयंकर होती की पॅसेंजर ट्रेनचे डबे अस्ताव्यस्त होऊन मालगाडीवर चढले, तर काही डबे रुळावरून घसरले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मालगाडी लाल खदान परिसरात उभी होती. कोरबा पॅसेंजर ट्रेन मालगाडीच्या शेवटच्या डब्यांना जाऊन धडकली. यात आठ लोक जागीच ठार झाले, तर एक व्यक्ती डब्याच्या आतमध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातात ओवरहेड वायरचेही नुकसान झाले. सिग्नल यंत्रणा कोलमडून पडली. रेल्वेची मदत पथके, आरपीएफ कर्मचारी, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी काही वेळातच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.