
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश चाचणी (नीट) रद्द करण्यासाठी तामीळनाडूतील द्रमुक सरकारकडून हालचाल सुरू झाली आहे. यंदाच्या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश चाचणी (2021) मध्ये सवलत देण्यात येऊ शकते. सरकार यासाठी विधानसभेत विधेयक सादर करणार आहे. आधीच्या एआयएडीएमके सरकारनेही असा प्रयत्न केला होता, पण राष्ट्रपतींच्या मंजुरीअभावी तो मागे पडला. अलीकडेच तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन विधानसभेत म्हणाले होते की, ‘‘सरकार सुरू अधिवेशनातच हे विधेयक सादर करेल. राज्यातील नीट परीक्षा रद्द करण्याबाबत आमदार उदानिधी स्टॅलिन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, न्यायमूर्ती ए. के. राजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या अहवालाचा सखोल अभ्यास केल्यानंतर सरकार विधेयक सादर करेल.’’
























































