राजन अध्यक्षपदी, तर सौमिल, सिद्धार्थ उपाध्यक्षपदी बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिलीयर्डस् ऍण्ड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची निवडणूक रविवारी मुंबईत पार पडली. यामध्ये चार महत्त्वाच्या पदांसाठी बिनविरोध निवड झाली, तर व्यवस्थापकीय समितीसाठी मतदान झाले. राजन खिनवासरा यांची अध्यक्षपदी, सौमिल करकेरा व सिद्धार्थ पारीख यांची उपाध्यक्षपदी, मानव पांचाळ, रिषभ कुमार यांची सहसचिवपदी आणि शेखर सुर्वे यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली. तसेच विशाल मदन, प्रणव चिखल, वेंकटेस्वरन सुब्रमण्यम, अमित सप्रु, अंगद भाटी व आदित्य देशपांडे यांची व्यवस्थापकीय समितीत निवड करण्यात आली आहे. 

महानगरपालिका शाळांतील मुलांसाठी कोचिंग सुरू करणार – सौमिल

मुंबईतून पंकज अडवाणीसारखे अव्वल खेळाडू घडावेत यासाठी ही असोसिएशन प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मदतीने मुंबईत एखादी जागा मिळाल्यास तेथे बिलीयर्डस् व स्नूकर या खेळांसह आणखी काही खेळांसाठी ऍकॅडमी सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. तेथे पालिका शाळांतील मुलांना फ्री कोचिंग देण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे उपाध्यक्ष सौमिल करकेरा यांनी नमूद केले.

आदित्य ठाकरे यांचा मोलाचा सपोर्ट

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे खेळावर प्रचंड प्रेम आहे. त्यांचाही आम्हाला पदोपदी मोलाचा सपोर्ट लाभला आहे. यापुढेही ते आमच्यासोबत असतील, असे सौमिल करकेरा पुढे म्हणाले.

खेळाला पुढे न्यायचेय… जिल्हे स्थापन करायचेत…

बिलीयर्डस् व स्नूकर या खेळाला पुढे नेण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहोत. महाराष्ट्रात या खेळाची फक्त एकच असोसिएशन आहे. या खेळाची आणखी प्रगती व्हावी यासाठी यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात सलंग्न असोसिएशनची स्थापना करायची आहे. त्यामुळे हा खेळ तळागळात पोहचू शकेल, असे सौमिल करकेरा यांनी आवर्जून सांगितले.