
महेश कुलकर्णी । संभाजीनगर
प्रश्न सगळेच मांडत असतात, पण त्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे विरळाच. शहरातील कचर्याचे ढिगारे, त्यातून सुटणारी दुर्गंधी, त्यासाठी जबाबदार असणारी यंत्रणा…सगळेच शिसारी आणणारे. परंतु या कचर्यातूनही ऊर्जेचा किरण शोधणारे अवलिया आहेत. श्रेयनगरमधील गोखले दाम्पत्याने असाच अभिनव प्रयोग केला. स्वयंपाकघरातून बाहेर पडणारा ओला कचरा न फेकता त्यापासून चक्क गॅसची निर्मिती केली. आता त्यांना गॅस सिलिंडरची गरजच पडत नाही!
गेल्या वर्षभरापासून शहरात कचर्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्तोरस्ती साचलेले ढिगारे, त्यावर घोंगावणार्या माशा… हे भयावह चित्र मनाला क्लेश देणारे. या परिस्थितीला जबाबदार कोण तर आपणच! कचरा आपण करतो आणि स्वच्छ दुसर्याने करावा अशी अपेक्षा करतो याच जाणिवेतून श्रेयनगरमध्ये राहणारे धनंजय गोखले व त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी कचर्याचा उपयोग करायचे ठरवले. सुरूवातीला त्यांनी ओल्या कचर्यापासून सेंद्रिय खत बनवण्याचा प्रयोग केला. ही प्रक्रिया साधारण दीड महिना चालते. त्यामुळे ओल्या कचर्याचा उपयोग आणखी वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो का याचा त्यांनी विचार केला. पुणे येथील प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. सहस्त्रबुद्धे यांनी ‘वायूमित्र’ या नावाने ओल्या कचर्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याचा प्रयोग केला आहे.
धनंजय गोखले व अश्विनी गोखले यांनीही जवळपास ४० हजार रुपये खर्च करून त्यांच्या त्रिदल अपार्टमेंटमध्ये बायोगॅसची टाकी बसवली. अपार्टमेंटमधील इतर सदस्यांनीही त्यांना सहकार्य केले. एक हजार लिटरच्या या टाकीत दररोज अपार्टमेंटमध्ये जमा होणारा साधारण ७ किलो ओला कचरा टाकला जातो. सुरूवातीला ओला-सुका कचरा वेगळा करताना त्रास झाला. पाहिजे तेवढी मात्रा मिळत नव्हती. आता सकाळ झाली की अपार्टमेंटचा वॉचमन नरेश हा सगळ्या फ्लॅटमधला ओला कचरा गोळा करून त्यात टाकतो. प्रक्रिया होऊन साधारण दिवसभर पुरेल एवढा गॅस तयार होतो. या टाकीतून बाहेर पडणारे पाणी झाडांना उत्तम खत म्हणून वापरता येते.
श्रेयनगरमधील गोखले दाम्पत्याने ओल्या कचर्यापासून स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करून आदर्श निर्माण केला आहे. हॉटेल्स, मंगल कार्यालये, मेस या ठिकाणी हा प्रयोग करणे सहज शक्य आहे. यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणार आहोत. – शिल्पाराणी वाडकर, नगरसेविका
श्रेयनगरमधील त्रिदल अपार्टमेंटमधून ओला कचरा देण्यात येत नाही. सर्व फ्लॅटचा ओला कचरा बायोगॅस संयंत्रात टाकण्यात येतो. शहरातील मोठ्या सोसायट्या, रोहाऊसेस, बंगले अशा ठिकाणी हा सहज, सुलभ बायोगॅसचा प्रकल्प करणे शक्य आहे. त्यामुळे कचर्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. – गौतम महाली, एव्हीटीस स्वयंसेवी संस्था
कचरा आपण करतो आणि तो स्वच्छ दुसर्याने करावा अशी अपेक्षा करतो. हे चूक आहे. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ असे प्रत्येक नागरिकाने ठरवले तर सुंदर व स्वच्छ शहर होण्यास वेळ लागणार नाही. – धनंजय गोखले, अश्विनी गोखले




























































