ताडोबा सुरक्षीत, बर्ड फ्लूची एकही केस नाही

राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूची लागण झाली असली तरी पक्षांचा मोठा अधिवास असलेल्या ताडोबा प्रकल्पात अजून तरी याची लागण झालेली नाही. त्यामुळं ताडोबा पर्यटकांसाठी अद्याप सुरक्षीत आहे.

ताडोबात 320 प्रकारचे पक्षी आढळतात. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव राज्यात दिसू लागल्यापासून या सर्व पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ताडोबा कोअर आणि बफर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून, रोज याची माहिती वरिष्ठांना दिली जात आहे.

स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतरित पक्षीही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. ताडोबाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या इरई धरणाच्या कुरण क्षेत्रात त्यांचा मोठा वावर असतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता ताडोबाचे सर्व कर्मचारी निरीक्षणासाठी सज्ज ठेवले गेले आहेत. पण अजूनपर्यंत अशी कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याने पर्यटकांना कोणताही धोका इथे नाही. काही दिवसांपूर्वी ताडोबात पक्षी मेल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, पण ती केवळ अफवा होती. त्यावर पर्यटक आणि स्थानिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन ताडोबा व्यवस्थापनाने केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या