तिसऱया लाटेला निमंत्रण देण्यासाठी भाजप रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेल्टा प्लस या अधिक घातक विषाणूचा वाढता संसर्ग व कोरोनाच्या तिसऱया लाटेचे सावट राज्यावर आहे. अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या आदेशाविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री व ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत राज्यभरात चक्का जाम आंदोलन केले. मात्र या आंदोलनात कोरोना प्रतिबंधक नियमांचा कुठे मागमूसही नव्हता. हे आंदोलन ओबीसींना न्याय देण्यासाठी होते की कोरोनाच्या तिसऱया लाटेला निमंत्रण होते? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून केला जात आहे.

…तर राजकीय संन्यास घेईन – देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारला ओबीसी आरक्षण देणे जमत नसेल तर त्यांनी सूत्रे आमच्याकडे सोपवावी. चार महिन्यांत आरक्षण परत मिळवून दिले नाही तर राजकीय संन्यास घेईन, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील याचिकाकर्ते हे काँग्रेसचे आहेत. त्यांच्यामुळेच आरक्षण गेले. या सरकारला आरक्षण देण्यासाठी आम्ही भाग पाडू. त्यासाठी आपले हे आंदोलन यापुढेही राहील, असे ते म्हणाले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ आणि केवळ राज्यातील ओबीसींचे आरक्षण मात्र रद्द झाले. त्यामुळे एक तर ओबीसी आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईत आंदोलन

मुंबईत भाजपचे नेते व विधानसभा मुख्य प्रतोद अॅड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड टोकनाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाण्याकडून मुंबईला जाणार वाहतूक रोखली. सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप यावेळी आशीष शेलार यांनी केला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.