अरेरे! काय ही अवस्था…पवारांच्या ‘दादां’नी भाजपचे कपडे फाडले ! परभणीत राडा

महापालिकेसाठी अजून प्रचाराला सुरूवातही झाली नाही तोच परभणीत अजित पवार गट आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले. एवढेच नाही, तर चाकूचा धाक दाखवून पिटाळण्याचाही प्रयत्न केला. मार खाल्लेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले, त्यापाठोपाठ चोप देणारेही आले. दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या.

परभणी महापालिकेसाठी आज चिन्हांचे वाटप झाले आणि प्रचाराला सुरुवात झाली. देशमुख हॉटेल परिसरात महायुतीतील – मित्रपक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने – सामने आले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते वामन रमाकांत मोरे यांना बेदम मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले. एवढेच नाही, तर त्यांच्यावर चाकूहल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देशमुख हॉटेल परिसरात धाव घेतली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. अगोदर राष्ट्रवादीचे विजय नागोराव काळे यांनी तक्रार दिली. त्यानंतर भाजपच्या वतीनेही तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे मांडवली करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.