राज्यसभेची ‘निवडणूक’ होणार; भाजपने तिसरा उमेदवार उतरवला, गोयल, बोंडे, महाडिक यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून जाणाऱया सहा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक रंगणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून रविवारी रात्री तीन जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, माजी आमदार अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे.

भाजप आणि काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. रविवारी सायंकाळी भाजपकडून आधी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि माजी आमदार अनिल बोंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तेव्हा राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होणार असे मानले जात होते. मात्र रात्री उशिरा भाजपकडून कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभेत 287 सदस्य आहेत. त्यामधून सहा उमेदवार पाठवायचे आहेत. एका सदस्यास पहिल्या पसंतीची 42 मते आवश्यक आहेत. विधानसभेत भाजपकडे 106 आमदार आहेत, दोन उमेदवार निवडून येऊन भाजपकडे 22 मते उरणार आहेत. तर शिवसेनेकडे 55 आमदार, राष्ट्रवादीचे 54, काँग्रेसचे 44 संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार आपला प्रत्येक एक उमेदवार निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीकडे शिवसेना 13, राष्ट्रवादी 12 आणि काँग्रेस 2 अशी 27 मते अतिरिक्त आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील अपक्षांची मते तसेच अन्य छोटय़ा पक्षांची मते मिळल्यास शिवसेनेचे दुसऱया जागेचे गणित सोपे होत आहे.

11 छोटय़ा पक्षांकडे 16 मते

11 छोटय़ा पक्षांकडे 16 मते आहेत. त्यातील क्रांतिकारी शेतकरी पक्ष, प्रहार, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी महाविकास आघाडीशी बांधील आहेत. अपक्ष व छोटे पक्ष हे आजपर्यंत सत्ताधारी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत.

कोल्हापूरचे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात सामना रंगणार

शिवसेनेकडून शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसमधून इम्रान प्रतापगडी तर भाजपकडून पीयूष गोयल आणि माजी आमदार अनिल बोंडे यांचा विजय निश्चित आहे. संख्याबळानुसार यांना पहिल्या पसंतीची 42 मते मिळणार हे निश्चित मानला जात आहे. खरी चुरस रंगणार आहे ती सहाव्या जागेसाठी. कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार संजय पवार आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात.

काँग्रेसची इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी काँग्रेसने आज अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना संधी दिली आहे. प्रतापगडी हे नामवंत कवी असून ते उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचे रहिवासी आहेत. ‘मदरसा’ व ‘हां मै कश्मीर हूं’ या त्यांच्या उर्दू रचना प्रचंड गाजलेल्या आहेत. महाराष्ट्रातून मावळते सदस्या पी. चिदंबरम यांना संधी नाकारण्यात आली असली तरी तामीळनाडूतून काँग्रेसने त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली आहे. हरयाणातून अजय माकन, तर छत्तीसगढमधून राजीव शुक्ला यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश कर्नाटक तर विवेक तनखा हे मध्य प्रदेशातून पक्षाचे उमेदवार असतील. राजस्थानातून मुकुल वासनिक यांच्यासह पक्षाचे मीडिया विभागाचे प्रमुख रणजितसिंह सुरजेवाला व उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांना संधी देण्यात आली आहे.

गुलाम नबी, शर्मांचा पत्ता कट

पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱया ‘जी 23’ गटाच्या गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा यांना पक्षाने राज्यसभेसाठी संधी नाकारल्याचे आज स्पष्ट झाले. मात्र ‘जी 23’ गटातील मुकुल वासनिकांना मात्र महाराष्ट्रातून विरोध झाल्याने राजस्थानातून संधी देण्यात आली आहे.