
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत मानले जातात. मात्र, गुजरातमधील भाजप नेते आणि पेंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार होते, अशी मुक्ताफळे उधळत नव्या वादाला तोंड पह्डले आहे. महाराजांच्या नावावर राजकारण करू पाहणाऱया भाजप नेत्यांच्या विधानावरून महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून शिवप्रेमी जनतेतून याचा तीव्र निषेध होत आहे.
सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना पेंद्रीय जलमंत्री सी.आर.पाटील म्हणाले, मला सांगताना आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजही पाटीदार समाजाचे होते आणि त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या विधानामुळे महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात अनेकांनी हा प्रकार म्हणजे महापुरुषांना समाजाच्या, जातीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. महाराजांचा इतिहास सर्वसमावेशक असताना त्यांना एखाद्या समाजापुरते मर्यादित करणे हे धोकादायक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नेमकं काय म्हणाले?
‘सरदार वल्लभभाई पटेल यांना संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचं श्रेय द्यायला हवं. सरदार पटेल हे पाटीदार समाजाचे व्यक्ती होते. समाजात कुणीही उपाशी राहू नये याची काळजी पाटीदार समाजाकडून घेतली जाते. त्यालाच पाटीदार म्हणतात. मला हे सांगायला आनंद होतोय की, छत्रपती शिवाजी महाराज हेदेखील पाटीदार होते. त्यांनी हिंदू समाजाची स्थापना करण्याचा पूर्ण प्रयत्न यशस्वीपणे केला, असं सी. आर. पाटील म्हणाले.
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो. पाटील यांचं भाषण मी काही ऐकलेलं नाही; पण छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची वंशावळ, भोसले घराणं, सातारची गादी हे सगळ्यांना माहीत आहे.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर महाराष्ट्रात येऊन गडकोट फिरावेत. त्यांचा इतिहास अभ्यासावा. महाराजांचे विचार आणि कार्य आत्मसात न करता केवळ त्यांच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे हे निषेधार्ह आहे.
संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
हे विधान पूर्णपणे राजकीय हेतूने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या समाजाचे होते, हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. महाराज सर्वांचे होते. मात्र इतिहास सांगतो की, ते मराठा होते आणि त्यांनी स्वतः आपल्या पत्रांमधून त्याचा उल्लेख केला आहे. इतिहास स्पष्ट असताना अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे इतिहासाचे वाचन न केल्याचे द्योतक आहे. संजय सोनवणी, इतिहास अभ्यासक


























































