अतिक्रमण काढण्यासाठी 50 लाखांची मागणी, नगरमधील भाजपच्या नगरसेवकासह 8 जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोखर्डी शिवारातील नऊ गुंठे जागेवर अधिकृतपणे तारेचे कंपाउंड करून जागेवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2021 ते 9 जानेवारी 2022 या कालावधीत ही घटना घडली.

नगरसेवक स्वप्नील शिंदे, सचिन रोहिदास शिंदे, अनिल ढवण (रा. वैदुवाडी, सावेडी) यांच्यासह इतर पाच ते सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रकाश दादासाहेब जाधव (रा.समतानगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोखर्डी शिवारातील गट नंबर 170 मधील 9 गुंठे जागा ही सुनंदा धुमाळ यांच्या मालकीची आहे. आरोपींनी या जागेला अनधिकृतपणे तारेचे कंपाउंड करून त्या ठिकाणी ‘स्वप्निल’ नावाचा बोर्ड लावला. अतिक्रमण काढण्यासाठी जाधव यांच्याकडे 50 लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली. त्यांना शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी जागा मालक सुनंदा धुमाळ यांचे बंधू डॉ. प्रकाश जाधव यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेवक शिंदेसह सात ते आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.