विक्रमगडमध्ये भाजपचे ‘नोट लो वोट दो’, 500 रुपये घ्या, कमळाचे बटन दाबा! व्हायरल व्हिडीओमुळे पोलखोल

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून पैशांचा वारेमाप वापर झाल्याचे उघडकीस आले आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात भाजपचे कार्यकर्ते मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपये देऊन कमळाचे बटन दाबण्यास सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. ‘नोट लो वोट दो’चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे भाजपची पोलखोल झाली आहे. या व्हिडीओमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल आणि नोटा भरलेली पाकिटे दिसत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून सर्वच स्तरांतून भाजपवर टीकेची झोड उठली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात भाजपच्या उमेदवाराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेक ठिकाणी भाजपवाल्यांना मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपवाल्यांनी निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर केल्याचा आरोप सर्वच स्तरांतून केला जात असताना आता मतदारांना पैसे वाटप करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला हे सिद्ध झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील आहेत. या व्हिडीओमध्ये काहीजण मतदारांना पैसे वाटत असून कोणी काहीही बोलले तरी तुम्ही तीन नंबरवर असलेले कमळाचे बटन दाबण्यास सांगत आहे. एक व्यक्ती आपल्या हातात पैशांचे बंडल घेऊन ते पाकिटात टाकून मतदारांना वाटत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पैसे वाटपाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या गोटात एकच पळापळ उडाली आहे.

पैसे वाटले यावर शिक्कामोर्तब

निवडणुकीदरम्यान भाजपने पैशांचा पाऊस पाडल्याची चर्चा होती. या व्हिडीओमुळे त्या चर्चेला दुजोरा मिळाला असून प्रत्येक बूथवर अडीच लाख रुपयांचा खर्च भारतीय जनता पार्टीने केल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. या व्हिडीओमुळे त्या चर्चेलाही दुजोरा मिळाला आहे. पैसे वाटल्याचा हा अधिकृत पुरावा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा यांनी केला आहे. लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम भाजपने केले आहे. याप्रकरणी पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून पैसे वाटप करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया सुनील भुसारा यांनी व्यक्त केली आहे.