‘ऑपरेशन लोटस’ला ‘ऑपरेशन हस्त’ने उत्तर? कर्नाटकात भाजप आमदारांची काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या निकालानंतर भाजपला चांगलेच हादरे बसत आहेत. हिंदुस्थानच्या दक्षिणेकडील हाती असलेलं एकमेव राज्य भाजपच्या हातून निसटलं असून आता येथील भाजप नेते काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत.

‘ऑपरेशन हस्त’च्या नावाखाली भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला चोख उत्तर देण्याच्या तयारीत काँग्रेस दिसत आहे. कर्नाटकचे काही भाजप आमदार त्यांच्या ‘मूळपक्षा’मध्ये परत जाण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री एस टी सोमशेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. त्यानंतर याचर्चांना उधाण आली आहे.

दरम्यान, हे वृत्त व्हायरल होताच बेंगळुरूमधील यशवंतपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार सोमशेकर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी त्यांची भेट ही ‘मतदारसंघाच्या विकासाबाबत’ होती. नंतर, त्यांनी सांगितलं की बैठकीत सर एम विश्वेश्वरय्या प्रसूती रुग्णालय आणि केंगेरी सॅटेलाइट टाऊनसाठी उड्डाणपूल आवश्यक असल्याची चर्चा झाली.

सोमशेकर अलीकडच्या काही दिवसांत काँग्रेस नेत्यांना भेटत आहेत आणि त्यांनी शिवकुमार यांचा उल्लेख ‘राजकीय गुरू’ करत कौतुकही केलं होतं.

दरम्यान, आणखी एक घडामोड घडली असून JD(S) नेते अयानूर मंजुनाथ यांनी रविवारी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांची भेट घेतली.

मंजुनाथ यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले की, ‘बरेच लोक आपल्याला भेटतात आणि त्यामागील कारण मी स्पष्ट करू शकत नाही’.

‘ऑपरेशन हस्त’ या शब्द काँग्रेसच्या हाताच्या चिन्हाचा संदर्भ आहे. त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण बरेच भाजप नेते आणि आमदारांना काँग्रेसच्या गोटात आणण्याची मोहीम सुरू असल्याचं बोललं जात आहे.

‘ऑपरेशन हस्त’ हे 2019 मध्ये भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा बदला म्हणून असल्याचं म्हटलं जात आहे.

भाजपचे अनेक आमदार आणि नेते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त असल्यानं भाजपनं आपला पक्ष एकत्र ठेवण्यासाठी कसरत सुरू केली आहे आणि आपल्या नाराज आमदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.