
राज्यसभा वडणुकीसाठी भाजपने चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह माया ईवनाते आणि निरामराव वडकुते या तीन नवीन चेहऱयांचा समावेश आहे. रिपाइं नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भाजपच्या कोटय़ातून राज्यसभेवर गेलेल्या डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळानुसार यावेळी भाजपला चार उमेदवार राज्यसभेवर पाठविण्याची संधी आहे. यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. महाराष्ट्र भाजपकडून 24 जणांची यादी यासाठी दिल्लीला पाठविण्यात आली होती. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राजकीय अनुभव, पक्षनिष्ठ, जातीय आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा समतोल साधत चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी विनोद तावडे यांचे नाव सुरुवातीपासूनच निश्चित मानले जात होते. सध्या केरळ विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या तावडे यांना बिहारमधील विजयाची बक्षिसी राज्यसभेच्या रूपाने मिळाली आहे. दलित व्होट बँकेचा विचार करता रामदास आठवले यांना तिसऱयांदा भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे धक्कातंत्र
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला जातो. त्यानुसार माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर करत आश्चर्याचा धक्का दिला आहे. आदिवासी समाजाच्या नेत्या आणि नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामराव वडकुते धनगर समाजाचे नेते असून विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
दिग्गजांना धक्का
भाजपकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, भारती पवार, माजी खासदार प्रीतम मुंडे, अमर साबळे, विनय सहस्रबुद्धे, डीकीचे मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, दिलीप कांबळे, माधव भांडारी, डॉ. संगीता फुसाटे यांच्यासह अनेक दिग्गज राज्यसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी त्यांच्या नावावर फुली मारत दिग्गजांना धक्का दिला आहे.


























































