मराठा आरक्षणावर भाजपाने मसुदा जाहीर करावा – प्रकाश आंबेडकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करणारा मसुदा जाहीर करावा, असे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विशेष अधिवेशन घेवून आणि सरकारने विरोधी पक्षांच्या बैठका घेवून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी कोणी स्पष्ट भूमिका मांडत नाही. भाजपा सरकारला याचे गांभीर्य नाही. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षणाबाबत मसुदा जाहीर करावा. सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असेही ते म्हणाले. आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करा, या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मतावर ते म्हणाले की, त्यांनी आधी घटना दुरुस्तीचा मसुदा जाहीर करावा.