भाजपमध्ये येण्यासाठी टीएमसी नेत्यांना धमक्या, ममता बॅनर्जी यांचा आरोप

41

सामना ऑनलाईन । कोलकाता

टीएमसी नेत्यांना आणि निवडून आलेल्या उमेदवारांनी भाजपमध्ये सामील व्हावे यासाठी केंद्रीय एजन्सीज त्यांना धमक्या देत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी येथे केला. टीएमसीचे हे नेते भाजपच्या संपर्कात आले नाहीत तर त्यांना चिटफंडसारख्या खोटय़ा प्रकरणांमध्ये जेलमध्ये पाठवू असेही या एजन्सीजचे धमकावणे सुरू असल्याचे ममतांनी सांगितले.

टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी कोलकाता येथे त्या शहीद दिवस रॅलीमध्ये बोलत होत्या. भाजपच्या मनमानी कारभाराविरोधात येत्या 26 जुलै रोजी टीएमसीकडून राज्यव्यापी विरोध प्रदर्शन केले जाईल. भाजपने जमवलेला काळा पैसा परत करण्याची मागणीही आम्ही करणार आहोत, असे त्या म्हणाल्या.

दोन कोटींची ऑफर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाल्या की, टीएमसीमधून भाजपमध्ये येण्यासाठी आमच्या नेत्यांना दोन-दोन कोटी रुपयांची ऑफर दिली जात असून सोबत एकेक पेट्रोल पंप देण्याचीही पेशकश त्यांच्यासमोर ठेवली जात आहे. कर्नाटकाप्रमाणेच भाजपकडून येथेही आमदारांच्या खरेदीचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे सर्व पाहता केंद्रातील भाजप सरकार दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, असे भाकीतही ममता यांनी यावेळी केले.

आपली प्रतिक्रिया द्या