
शेतकरी आंदोलनाकरून सेलिब्रिटींकडून करण्यात आलेल्या ट्वीटची चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र यावरून तीळपापड झालेल्या भाजप नेत्यांकडून आज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव घेऊन आरोप करण्यात आले असता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आम्ही सचिन तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची चौकशी करत नाही तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करत असल्याचे विधानसभेत मंगळवारी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दय़ांवर बोलताना हे सरकार देशाभिमान बाळगणारे क्रिकेटर आणि गानसम्राज्ञी यांच्यसारख्या लोकांची चौकशी करण्याचे जाहीर करते ही बाब निषेधार्ह आहे. आपल्या देशाची हे लोक शान असताना त्यांची चौकशी तुम्ही करता? असे फडणवीस म्हणाले.
याच वेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आम्ही तेंडुलकर आणि मंगेशकर यांची चौकशी करत नाही तर समाजात चुकीचा संदेश पोहचविणाऱ्या एका पक्षाच्या आयटी सेलची चौकशी करत असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगताच भाजप सदस्य आक्रमक झाले. त्यांनी त्या पक्षाचे नाव जाहीर करा अशी मागणी केली. अखेर देशमुख यांनी भाजप आयटी सेलची चौकशी करत असल्याचे सांगताच फडणवीस संतप्त झाले. त्यांनी आम्ही तुमच्या असल्या चौकशीला घाबरत नाही. देशाभिमान बाळगणाऱ्यांसाठी आम्ही असल्या चौकशांना सामोरे जाऊ असे सांगितले.



























































