मी मुस्लिम धर्म स्वीकारल्यास कोण अडवेल? जदयू नेत्याच्या विधानावर भाजपचाही पलटवार

बिहारमध्ये जातीनिहाय जणगणनेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जातीनिहाय जनगणणा ही फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी होईल असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. त्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणणा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. आता जदयूचे संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी या वादात उडी घेतली आहे.

माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा बक्सर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. तेव्हा कुशवाहा म्हणाले की, कोणीही कुठलाही धर्म स्वीकारू शकतो. हा प्रत्येकाचा संविधानिक हक्क आहे. आज मी मुस्लिम धर्म स्वीकारला तर मला कोण थांबवू शकतं? धर्म परिवर्तन हा कुठल्याही दबावाखाली होऊ शकत नाही असेही कुशवाहा म्हणाले.

तसेच जातीनिहाय जनगणना व्हावी ही आमच्या पक्षाची जुनी मागणी आहे, या मागणीपासून आपण मागे हटणार नाही असेही कुशवाह म्हणाले. जातीनिहाय जनगणेच महत्त्व विषद करताना कुशवाह म्हणाले की, अनेक वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागासवर्गीयांच्या योजनेसाठी आकडेवारी मागितली आहे. परंतु 1931 नंतर देशात जातीनिहाय जनगणणा झाली नाही.

कुशवाहा यांच्यावर मित्रपक्ष भाजपने नाव न घेता टीका केली आहे. भाजप नेते राजीव रंजन यांनी ट्विट करून म्हटले की, मतांसाठी धर्म सोडू इच्छिणारे चांगली ऑफर मिळाल्यावर काही करू शकतात. जाती, धर्म हे वैयक्तिक आणि सामाजिक मुद्दे आहेत. त्याबाबत बोलताना राजकीय पक्षांनी विचार करावा. तसेच समाजात द्वेष पसरवणे चुकीचे असल्याचेही रंजन यांनी म्हटले आहे. रंजन यांनी आपल्या ट्विटमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही, परंतु कुशवाहा यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी  ही प्रतिक्रिया दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या