बिहारमधील तरुणांच्या दुर्दशेसाठी भाजप-जेडीयू दोषी – राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, काही दिवसांपूर्वी त्यांनी बिहारमधील तरुणांशी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. राज्याच्या दुर्दशेसाठी भाजप-जेडीयू सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. X वर एक पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “बिहारमधील तरुणांना हे चांगलेच माहिती आहे की, गेल्या २० वर्षात मोदी-नितीश सरकारने त्यांच्या आकांक्षांचा गळा दाबला आहे. राज्याला वाऱ्यावर सोडून दिले आहे आणि प्रत्येक पातळीवर राज्य रसातळाला ढकलले गेले आहे.”

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “बिहारमध्ये त्यांना भेटलेले सर्व तरुण अत्यंत आशादायक आणि बुद्धिमान आहेत. त्यांची प्रतिभा आणि कठोर परिश्रम आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात. परंतु सरकारने त्यांना संधींऐवजी बेरोजगारी आणि निराशा दिली आहे.” ते म्हणाले की, “आता बदलाची वेळ आली आहे. बिहारचा स्वाभिमान पुन्हा जागृत करण्याची वेळ आली आहे.”