भाजपला ‘केजरीवाल’ यांचे टेन्शन, दिल्ली विधानसभेसाठी पहाटे तीनपर्यंत सलग सात तास बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक तर जेएनयू प्रकरण पेटले आहे. शिवाय दिल्लीमधली ‘आप’चे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांची क्रेझ कायम असल्याने भाजपा नेतृत्वाचे धाबे दणाणले असून, येनकेनप्रकारेण दिल्ली जिंकायची यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेतेच कामाला लागले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काल सायंकाळी बोलावलेली भाजपा कोअर कमिटीची बैठक पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही बैठक संपून कोअर कमिटीचे सदस्य जांभई पूर्ण करत नाही तोच आज पुन्हा दिल्लीसंदर्भात बैठक बोलावण्यात आल्याने केजरीवाल फोबियाने भाजपाला चांगलेच त्रस्त केल्याचे दिसून येत आहे.

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार असले तरी उमेदवारांची निवड आणि व्यूहरचना ठरविण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी चालवली आहे. दिल्लीत केजरीवालांच्या तोडीचा एकही नेता भाजपाकडे नसल्याने भाजपाने ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध अऱविंद केजरीवाल अशी रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. जेएनयूच्या प्रकरणावरूनही धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा जोरदार प्रयत्न आहे. भाजपाच्या दिल्लीतील सभेत अमित शाह यांनी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारला अटकेपासून वाचविण्याचे पाप केजरीवालांनी केल्याची टीका जाणीवपूर्वक केली होती. केजरीवालांचा मुकाबला करणे सध्या भाजपासाठी मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील सत्ता गमावल्यानंतर आता दिल्लीतही सत्ता गेली तर भाजपाचे आणि विशेष म्हणजे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे नाक कापले जाईल.

…म्हणून शहा यांचे दिल्लीकडे लक्ष
शहा यांची स्ट्टेजिस्ट असेलेली इमेजही धुळीस मिळू शकते. त्यामुळे अमित शाह यांनी दिल्लीच्या निवडणुकीत वैयक्तीक लक्ष घातल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच भाजपाध्यक्षांनी काल रात्री बोलावलेली बैठक सलग सात तास चालून पहाटे कशीबशी आटोपली. दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपाने केलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणावर व उमेदवारांच्या नावावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली प्रभारी प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आदी नेते उपस्थित होते.