खोट्या देशभक्तीचा बुरखा फाटला, बांगलादेशी घुसखोरांसाठी भाजपची वकिली

भाजपच्या ढोंगी राजकारणाचे पितळ कल्याणमध्ये उघडे पडले आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम राबवायची आणि दुसरीकडे पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांसाठी कोर्टात वकिली करायची असा दुटप्पी कारभार कल्याणमध्ये उघड झाला आहे. कल्याण पूर्व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अॅड. एस. ए. दुबे हे मानपाडा पोलिसांनी पकडलेल्या सहा बांगलादेशी महिलांच्या बचावासाठी वकीलपत्र घेऊन न्यायालयात त्यांची बाजू मांडत आहेत. त्यामुळे भाजपच्या बेगडी हिंदुत्वाबद्दल कल्याण, डोंबिवलीत संताप व्यक्त होत आहे.

कश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरात पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात शोधमोहीम सुरू केली आहे. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 38 बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सहा महिला बांगलादेशी नागरिकांना डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा काहीच नाही. एजंटच्या मदतीने त्यांनी हिंदुस्थानात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. या महिलांविरुद्ध पारपत्र अधिनियम 1920 चे कलम 3, 4 तसेच परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14, 14 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, परंतु याच महिलांसाठी कल्याण पूर्व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अॅड. एस. ए. दुबे यांनी न्यायालयात वकिली केल्याने भाजपची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आली आहे.

हे तर घुसखोरांचे रक्षक

भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण पूर्व विधानसभा संघटक नारायण पाटील यांनी निषेध केला. एस. ए. दुबे यांनी राजकारणाबरोबर वकिलीदेखील करावी, पण वकीलपत्र कोणाचे घ्यावे याचे भान त्यांना हवे होते. एकीकडे बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांना हाकलून लावण्याची भाजप नेते भाषा करतात, तर दुसरीकडे त्यांचेच पदाधिकारी न्यायालयात घुसखोरांचे रक्षण करत आहेत. भाजपचा हा ढोंगीपणा असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.