राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे खूप छोटे नेते असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पाटील यांच्या या टीका-टिप्पणीमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनीही पाटील यांची ‘चंपी’ केली आहे. दिवसभर चंपी झाल्यानंतर पाटील यांनी मला शरद पवार यांच्याबद्दल तसे काही बोलायचे नव्हते, अशी सारवासारव रविवारी केली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या, मला चंपा म्हणता, हे चालते? माझे कालचे वक्तव्य हे ओबीसी आरक्षणासंदर्भातील होते. पवारांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता असेही पाटील यांनी नमूद केले.


























































