
सामना ऑनलाईन,नालासोपारा
नालासोपाऱ्यामध्ये रुपाली चव्हाण यांची हत्या करण्यात आली आहे. वसई-विरारच्या जिल्हा युवती सहप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. चव्हाण यांची हत्या दोन दिवसांपूर्वी झाली असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. चव्हाण यांना इस्त्रीचे चटके देऊन, शॉक देऊन नंतर त्यांना ठार मारण्यात आलं असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.
रूपाली या त्यांच्या नवऱ्यापासून विभक्त झाल्या होत्या. त्यांनी चप्पल,बुटांचं नवीन दुकान सुरू करण्याचं ठरवलं होतं. रुपाली या त्यांचा मुलगा आणि एक अनाथ मुलासोबत रहात होत्या. जो अनाथ मुलगा त्यांच्यासोबत रहात होता तो रुपाली यांच्या हत्येनंतर बेपत्ता झाला आहे. हा खून त्यानेच केला असावा असा पोलिसांना संशय आहे,मात्र खून का केला हे कळू शकलेलं नाही.
रुपाली दुकानासाठी लागणारा माल आणण्यासाठी सुरतला जात असल्याचं सांगून गेल्या होत्या. त्यानंतर दोन दिवस त्यांचा काहीच पत्ता नव्हता, यामुळे तिचे वडील त्या रहात असलेल्या घरी गेले आणि खिडकीतून डोकावून पाहिले. यावेळी त्यांच्या वडिलांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना रुपाली यांचा मृतदेह सापडला.

























































