
सामना प्रतिनिधी, मुंबई
भाजप आमदार राम कदम यांनी उधळलेल्या मुक्ताफळांनंतर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, त्यांचे प्रवक्तेपद काढले जाईल अशा रंगलेल्या चर्चा फोल ठरल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘माफी मागितली विषय संपला’ असे सांगत राम कदम यांची पाठराखण केलीच, तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हात जोडत त्यांच्याविषयी बोलणे टाळले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर त्याही पुढे जात ‘मीडियामुळे राजकारणी बदनाम होत आहेत’ असा जावईशोध लावला आहे.
भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठली. राम कदम यांच्याकडून आपल्या वक्तव्याबाबत खंत व्यक्त केली जात नसताना भाजपकडून त्यांच्यावर कारवाई होणार, भाजपमधून हकालपट्टी होणार, प्रवक्तेपद जाणार अशा चर्चा रंगल्या. त्यानंतर राम कदमांनी ट्विट करीत माफी मागण्याचे सोपस्कार उरकले, पण बेताल वक्तव्याबाबत त्यांच्यावर कारवाई होणार या चर्चा मात्र फोल ठरल्या आहेत. राम कदम यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी सपशेल हात जोडले. त्यांनी कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले.
दुसरीकडे कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी राम कदम यांच्याविषयी विचारले असता त्यांनी सपशेल पाठराखणच केली. राम कदम यांची पार्श्वभूमी महिलांना मदत करणारी आहे. हजारो महिला त्यांना राखी बांधतात. एखादे वाक्य चुकीचे बोलले तरी त्याचा अर्थ काय होता आणि जरी चुकीचा अर्थ निघत असेल तर त्यांनी आता जाहीर माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राम कदम यांच्यावर कोणती कारवाई करावी याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
प्रसारमाध्यमांवर खापर
प्रसारमाध्यमांवर याविषयीचे खापर फोडताना चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकप्रितिनिधींनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. तसेच एखाद्या वाक्याचा अर्थ काय होतो हे दाखवताना माध्यमांनी विचार केला पाहिजे. माध्यमांनीही त्यांना जे म्हणायचे होते तसा अर्थ जाईल हे बघितले पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले. तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विल्सन कॉलेजमधील एका कार्यक्रमात ‘प्रसारमाध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय, असे वक्तव्य केले. राजकारणात कुणाला यायचंय का, असा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना केला असता समोरून अत्यंत अल्प प्रतिसाद आला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
summary-bjp leaders back ram kadam


























































